मोतीबिंदू म्हणजे डोळयाच्या बाहुलीतले भिंग नेहमीप्रमाणे काचेसारखे पारदर्शक न राहता तांदळाच्या दाण्यासारखे पांढुरके होते. यामुळे प्रकाशकिरण आत शिरायला अडथळा होतो. मोतीबिंदू सहसा उतारवयात येतो. मधुमेहात तो लवकर येऊ शकतो. मोतिबिंदूची लक्षणं मोतीबिंदू आल्यावर नेहमीची तक्रार म्हणजे अंधुक दिसणे. रात्री गाडी चालवतांना समोरचा लाईट जास्त त्रासदायक होतो. दिव्याभोवती रंगीत कडी दिसतात. डोळयांसमोर काळे वर्तुळ दिसते. दिवसा (जास्त प्रकाशात) कमी दिसते. पण संध्याकाळी (कमी प्रकाश असतो तेव्हा) दिसण्यात थोडी सुधारणा होते, एकाऐवजी अनेक प्रतिमा दिसणे हे पण एक लक्षण आहे. कालपरत्वे दूरच्या आणि जवळच्याही वस्तू दिसणं बंद होतं. म्हणजेच मोतिबिंदू पिकतो. जास्त पिकल्यास काचबिंदूही होऊ शकतो. मोतीबिंदू किती पिकला आहे यावर तक्रारींचे स्वरूप अवलंबून असते इत्यादी. मोतीबिंदू लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून काढून त्याऐवजी डोळयातच कायमचे भिंग बसवले जाते. मात्र औषधाने मोतीबिंदू घालवणे शक्य नाही. तसेच उन्हामुळे मोतीबिंदू जास्त प्रमाणात व लवकर होतो. उन्हात काम करताना गॉगल लावणे चांगले. डोळयावर सावली येईल अशी टोपी वापरणे हा पण चांगला प्रतिबंधक उपाय आहे. प्रमुख कारणं
१.वाढत्या वयानुसार नैसर्गिक भिंगातील प्रथिनांमध्ये बदल होऊन ते अपारदर्शक होतात.
२. डोळ्यांना इजा झाल्यास.
३. डोळ्यांच्या इतर आजारांमुळे.
४. स्टेरॉइडसारखी औषधं दीर्घकाळ वापरल्यामुळे.
५. मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये मोतिबिंदू लवकर होतो.
६. काही रुग्णांना जन्मतः मोतिबिंदू असतो.